Ad will apear here
Next
वास्तुकलेचे माहेरघर – विजापूर
उत्तर कर्नाटकातील विजापूर हे दक्षिण भारतातील वास्तुकलेचे माहेरघर समजले जाते. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात या शहरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
.......
उत्तर कर्नाटकातील विजापूर हे दक्षिण भारतातील वास्तुकलेचे माहेरघर समजले जाते.सुलेखनकला आणि चित्रकला, विशेषतः लघुचित्रशैली यांना विजापूरच्या इस्लामी कलेत वेगळे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अफझलखान वधाच्या घटनेसह शहाजी महाराजांना झालेला दगाफटका अशा घटनांमुळे विजापूर विरुद्ध मराठा साम्राज्य हे संदर्भ सर्वांना परिचित आहेत. 

इतिहासतज्ज्ञांमध्ये विजापूर नावाविषयी एकवाक्याता दिसून येत नाही. कोरीव शिलालेख, संस्कृत-कन्नड-फार्सी साहित्य यांतून विजयपूर, राय राजधानी, दक्षिण वाराणसी, बिज्जनहळ्ळी, बिज्जपूर, मुहम्मदपूर इत्यादी भिन्न नावे दिसून येतात. पूर्वी या जागी सात खेडी होती व तेथेच यादवांनी हे नगर वसविल्याचे सांगितले जाते. या सात खेड्यांपैकी बिजनहळ्ळी खेड्यावरून या नगराला विजापूर हे नाव पडल्याचे समजले जाते. या गावाच्या परिसरात काही देवालयांत चालुक्य व यादव वंशातील राजांचे शिलालेख आहेत. तज्ज्ञांच्या मते आर्क किल्ल्याच्या पूर्वद्वाराजवळील असलेल्या विजयस्तंभावरील शिलालेखात विजयपूर असा स्पष्ट उल्लेख आहे. हा स्तंभ सातव्या शतकातील असावा. विजयपूर या नावाचा दुसरा उल्लेख चालुक्य राजा दुसरा जयसिंह (१०१५-१०४३) याच्या इ. स. १०३६च्या कोरीव लेखात, तसेच इ. स. ११००मधील नागचंद्रांनी लिहिलेल्या कन्नड भाषेतील ‘मल्लिनाथपुराण’ या काव्यात आढळतो. त्यावरून ११व्या शतकात वा तत्पूर्वी विजयपूर हे नाव प्रचारात असावे, असे म्हणता येते. पुढे विजयपूर या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट वा संक्षिप्त रूप विजापूर असे झाले असावे. बहामनी राज्याचे पाच राज्यांमध्ये विभाजन झाले, तेव्हा युसुफ आदिलखान (१४८९-१५१०) याने आदिलशाहीची स्थापना करून विजापूर ही आपली राजधानी केली. सन १६८६मध्ये औरंगजेबाने आदिलशाही खालसा केली. विजापूरवर सन १७२३पर्यंत मुघलांचा अंमल होता. पुढे ते हैदराबादच्या निजाम-उल्- मुल्कच्या अखत्यारीत गेले (१७२३). निजामाने हा भाग तोडून पेशव्यांना दिला. 

पेशवाईच्या अंतापर्यंत (१८१८) ते मराठ्यांच्या अधिसत्तेखाली होते. त्यानंतर ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. आधुनिक विजापूर ही धान्याची मोठी बाजारपेठ असून, ते एक औद्योगिक शहर आहे. ते महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेलगत असल्यामुळे या राज्यांतील ग्रामीण भागांतून येथे खरेदीसाठी मोठा जनसमुदाय जमतो. तेथे अनेक पर्यटक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात. वास्तूंमुळे ते पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे. जिल्ह्यात व शहरात हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणात असून, त्याशिवाय उदबत्ती आणि साबण तयार करण्याचे लघुउद्योग सर्वत्र चालतात. कातडी कमावणे आणि पादत्राणे बनविणे हा व्यवसाय कापड उद्योगाखालोखाल चालतो. हा परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांना समगर किंवा मोचिगर म्हणतात. शहरात वस्त्रोद्योग, तेलाच्या गिरण्या असे मोठे व्यवसाय आहेत. आदिलशाही राजवटीच्या २०० वर्षांच्या कालावधीमध्ये विजापूरची भरभराट झाली. अनेक वास्तू उभ्या राहिल्या. त्या आज जागतिक स्तरावरील पर्यटकांचे आकर्षण बनल्या आहेत. त्यापैकी काहींची माहिती घेऊ या. 

गोलघुमट

गोलघुमट :
याला बोलघुमट असेही म्हणतात. इ. स. १६२६मध्ये मोहम्मद आदिलशाह याने गोलघुमटाचे बांधकाम केले. याचे बांधकाम सुमारे ३३ वर्षे चालू होते. येथे खालच्या दालनात चबुतऱ्यावर मोहम्मद आदिलशाह, त्याच्या दोन बेगमा, रंभावती (अंगवस्त्र), मुलगी व नातू यांची थडगी आहेत. या ठिकाणी कबर नगारखाना, धर्मशाळा असून, नगारखान्यात अलीकडे वस्तुसंग्रहालय केले आहे. मशीद आणि ही वास्तू चौरस असून प्रत्येक बाजू ४३.५ मीटर लांबीची आहे. चारही कोपऱ्यांत अष्टकोनी घुमट असलेले सातमजली मनोरे आहेत. संपूर्ण वास्तूची उंची सुमारे ६८ मीटर असून, तिचे क्षेत्रफळ सुमारे १८९२ चौरस मीटर आहे. माथ्यावर मध्यभागी प्रचंड घुमट आहे. हा घुमट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भव्य घुमट आहे. त्याचा व्यास ३८ मीटर इतका आहे, व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्सच्या घुमटाचा पहिला क्रमांक लागतो. त्याचा व्यास ४२ मीटर आहे. लंडनमधील सेंट पोलचा तिसरा क्रमांक लागतो. त्याचा व्यास ३३ मीटर इतका आहे. यावरून गोलघुमटाच्या भव्यतेची कल्पना येईल. (पुणे येथील एमआयटी संस्थेच्या इमारतीवरील नव्याने झालेल्या घुमटाचा व्यास ४८.७८ मीटर असून, तो आता जगातील पहिल्या क्रमांकाचा घुमट ठरला आहे.)

घुमटाखालील दालनांमध्ये प्रशस्त गोलाकार सज्जा असून, या सज्ज्यातून भिंतीकडे तोंड करून उभे राहून पलीकडील बाजूस साधारण १२५ फुटांवर अगदी हळू आवाजात बोलले तरी स्पष्ट ऐकू जाते. म्हणून याला बोलघुमट असेही म्हणतात. सकाळी आठनंतर भरपूर गर्दी झाल्यावर मात्र हा आनंद घेता येत नाही. 

मालिक ए मैदान

मालिक-ए-मैदान :
विजापूरचे आणखी खास आकर्षण म्हणजे मालिक-ए -मैदान ही तोफ. अपभ्रंश होऊन या तोफेला मुलुखमैदान, मलिका ए मैदान असेही संबोधले जाते. निजामाने ही तोफ बनवून घेतली होती. तोफेवर कोरलेल्या अक्षरांनुसार ही तोफ हसन रुमी या तुर्की माणसाचा मुलगा मोहम्मद याने सन १५४९मध्ये ओतीव काम करून बनविली. या तोफेची लांबी १४ फूट सहा इंच आहे. त्याचा बाह्य व्यास पाच फूट, तर वजन ५५ टन आहे. ४० किलो स्फोटकांची क्षमता आहे. तोफेला बत्ती दिल्यावर तोफेच्या बाजूला असलेल्या टाकीमधील पाण्यामध्ये तोफकरी डुबकी घेत असे. ही तोफ प्रथम १५६१मध्ये तालिकोटच्या लढाईत वापरली गेली. ती ओढून नेण्यासाठी १० हत्ती, ४०० बैल लागत होते. तालिकोटच्या लढाईनंतर ही तोफ काही काळ महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा किल्ल्यावर ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती मुरार जगदेव याने सन १६३२मध्ये आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. सध्या विजापूरच्या बुर्ज-ए-शरीफ या बुरुजावर ही तोफ ठेवलेली आहे. 

मालिक-ए-मैदान तोफेसमोर उपाल बुरुजावर एक तोफ आश्चर्यकारक पद्धतीने चढविण्यात आली आहे. बुरुजाचे बांधकाम करतानाच ते थोडे थोडे उचलून घेऊन तोफ एका बाजूला ठेवून, दुसऱ्या बाजूला थोडा चढ करून पुन्हा तोफ चढाच्या बाजूला ओढून घ्यायची आणि परत विरुद्ध बाजूला बांधकाम करून परत त्या बाजूला ओढून घ्यायची, अशा पद्धतीने ही तोफ उंचावर नेण्यात आली.

इब्राहिम रौजा

इब्राहिम रौजा :
हे विजापूरमधील वास्तुकलेतील दुसरे मोठे आकर्षण आहे. इब्राहिम दिलशाह दुसरा (इ. स. १५८० ते १६२७) याने आपल्या चिरनिद्रेसाठी याची निर्मिती केली. ताजमहालच्या अगोदर ही इमारत पूर्ण झाली होती. ही इमारत संगमरवरी असती, तर छोट्या ताजमहालासारखी दिसली असती. असे म्हणतात, की ताजमहालाची कल्पना याचेवरूनच घेतलेली आहे. विजापूरचे सुलतान इस्तंबूल, तुर्कस्तानच्या तुर्क साम्राज्याचे वंशज होते. त्यामुळे या वास्तूवर तुर्की शैलीचा प्रभाव आहे. सुंदर आकर्षक बगीच्यामध्ये असलेल्या लॉनवर ही इमारत खुलून दिसते. पूर्वेकडील टोकाला मकबरा आहे आणि पश्चिमेकडील बाजूला मशीद आहे. मधील खुल्या जागेत कारंजे आहे. 

इब्राहिम रौजा येथील कलाकुसर

इब्राहिम रौजा

जुम्मा मशीद : विजापूर शहराच्या आग्नेयेला ही मोठी मशीद आहे. सन १५६५मध्ये याचे बांधकाम सुरू झाले; पण थोडे अपुरे राहिले. अली आदिलशाहने तालिकोटच्या विजयानंतर तिचे बांधकाम केले. मशीद १० हजार ८१० चौरस मीटर क्षेत्रात पसरली आहे. मशिदीची इमारत १७० मीटर लांब, ७० मीटर रुंद, आयताकृती आहे. येथे दर शुक्रवारी खुतुबा वाचतात. मशिदीचा घुमट आकर्षक आहे. खालील कमानीवर पर्शियन भाषेत वचने लिहिली आहेत. औरंगजेबाच्या आदेशानुसार जमिनीवर पॉलिश केलेल्या सुंदर २२५० फरश्या बसविल्या आहेत. औरंगजेबाने पूर्वेकडे, दक्षिणेस व उत्तरेकडील वेस व व्हरांडा यांचे बांधकाम वाढविले. 

जुम्मा मशीद

विजापूर किल्ला - खंदकविजापूर किल्ला : संरक्षणाच्या दृष्टीने युसुफ आदिलखानाने आर्क नावाचा मातीचा किल्ला शहराच्या मध्यभागी बांधला. पहिल्या आदिलशाहने त्याच्या सभोवती सुमारे १० किलोमीटर घेराची दगडी तटबंदी ९६ बुरुज व सहा मोठ्या दरवाज्यांसह बांधली. या सहा मोठ्या दरवाज्यांना अलीपूर, बहामनी, शहापूर, मक्का, फत्तेह अशी नावेही ठेवण्यात आली. प्रत्येक दरवाज्याच्या आत दुसरा दरवाजा अशी संरक्षणात्मक व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण तटबंदीला सुमारे १२-१५ मीटर रुंदीचा खंदक खणण्यात आला होता. किल्ल्यात असर महाल, आनंद महाल, आरसे महाल, चिनी महाल, सातमजली महाल, गगनमहल, मक्का मशीद, चिंदडी मशीद अशा खास इमारती होत्या. त्यांतील फारच थोड्या सुस्थितीत आहेत. 

गगनमहल : गगनमहल सन १५६१मध्ये आदिलशाहने बांधला असे म्हटले जाते. या महालाने राज्यातील महत्त्वाच्या घटना पाहिल्या आहेत. राणी चांदबीबी हिने येथूनच राज्यकारभार केला होता. सध्या या महालाची बऱ्याच अंशी पडझड झालेली आहे. या महालामध्ये तीन भव्य कमानी आहेत. आतील सर्वांत मोठी आहे. याच्या तळमजल्यावर दरबार हॉल होता आणि पहिल्या मजल्यावर राजाचे कुटुंब राहत असे. 

असरमहल

असरमहल :
किल्ल्याच्या पूर्वेला असलेला हा महाल सन १९४६मध्ये आदिलशाहने बांधला. येथे न्यायदानाचे काम चालत असे. पॅलेसच्या वरच्या भागात अनेक भित्तिचित्रांची सजावट केली आहे. या भित्तिचित्रांमध्ये, फुले आणि पाने, स्त्रिया आणि पुरुष दर्शविलेले आहेत. नंतर येथे पैगंबरांचे दोन पवित्र केस ठेवले आहेत. येथे स्त्रियांना येण्यास बंदी आहे. हे पवित्र ठिकाण मानले जाते. 

ताज बावडी प्रवेशद्वार

ताज बावडी

ताज बावडी :
हा एक बांधीव तलाव आहे. तो इब्राहिम दुसरा याची पहिली पत्नी ताज सुल्तानाच्या स्मृतीसाठी बांधण्यात आला होता. प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे आणि दोन अष्टकोनी घुमट आहेत. दोन घुमटांच्या पूर्वेकडील आणि पश्चिम भागाचा वापर विश्रांतीघरे म्हणून केला जात असे. 

सात मंझिलमेहतर महालातील सूक्ष्म, अनवट वास्तुशिल्पीय कोरीव काम आणि आकारिक घडण यांत हिंदूंच्या वास्तुकलेतील आकारिक घटक आणि शिल्पवैशिष्ट्ये आहेत.

सात मंझिल : मूलतः ही सात मजली इमारत होती. परंतु आता फक्त पाच मजले अस्तित्वात आहेत. इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या शासनकाळात १५८३मध्ये याचे बांधकाम करण्यात आले. 

संगीत-नारी महल : हा महाल विजापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. जवळ जलाशय असून, तेथे आदिलशाही वास्तुकलेचे दर्शन होते. 

बाराकमान : सन १६७२मध्ये बांधण्यात आलेला अली रोझाचा हा एक मकबरा आहे. सार्वजनिक उद्यानात मध्यभागी असलेल्या गगनमहलच्या उत्तरेस तो आहे. सुरुवातीला ते अली रोझा या नावाने ओळखले जात असे. परंतु शाह नवाब खान याने त्याचे नाव बाराकमान असे केले. कारण हे त्याच्या राज्यकाळातील १२वे स्मारक होते आणि त्याला १२ कमानी होत्या. एका उंच चबुतऱ्यावर ही इमारत बांधलेली आहे. यात गॉथिक शैलीमध्ये सात खांब आहेत. आत काही थडगी आहेत. तेथे बहुधा अलीखान आणि ११ स्त्रियांच्या कबरी आहेत. 

बाराकमान - १८७०मधील फोटो

आनंदमहल

आनंदमहल :
हा महाल १५८९मध्ये आदिलशाह याने बांधला होता. हा दोन मजली राजवाड्यातील जनानखाना होता. सध्या हा महाल जिमखाना क्लब, इन्स्पेक्शन बंगला, काही इतर कार्यालये आणि सहायक आयुक्तांचे कार्यालय म्हणून वापरात आहे. 

साठ कबर

साठ कबर :
याला विजापूरमधील ‘काळे पर्यटनस्थळ’ असे म्हटले जाते. कारण येथे एक अतिशय दुःखद घटना घडली असे समजले जाते. सरदार अफजलखानाने आपल्या ६० बायकांना येथे मारून टाकले, अशी दंतकथा आहे. प्रतापगड मोहिमेमध्ये त्याला मृत्यू आल्यास या बायका परत विवाह करतील. म्हणून त्याने जायच्या अगोदर त्यांना मारले, असे म्हणतात. अर्थात, या गोष्टीला ऐतिहासिक पुरावा नाही. तरीही येथे गर्दी पर्यटकांची होते. 

तोरवी नरसिंह मंदिरविजापूरच्या आसपास :
तोरवी नरसिंह मंदिर : विजापूरपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे नरसिंह मंदिर आहे. आदिलशाहीच्या संगीतमहलच्या अगदी जवळ हे आहे. या मंदिराजवळ देवी लक्ष्मीचे आणखी एक हिंदू मंदिर स्थित आहे. विजापूरमधील लोक दर शनिवारी या मंदिराला भेट देतात. ‘दी ग्लोरी ऑफ विजापूर’ या इंग्रजी पुस्तकामध्ये याचे वर्णन आहे. या मंदिराबद्दल शिलालेखांत उल्लेख आहे. हे शिलालेख विजापूर किल्ल्यामागील पूर्वेकडील शहराच्या प्रवेशद्वारावर, वेशीवरील खांबावर व इतर भागांत संस्कृत व कन्नड भाषेत आहेत. या देवस्थानांना चालुक्य व देवगिरीचे यादव राजे यांनी देणग्या दिल्याचे उल्लेख आहेत. हे शिलालेख इ. स. १०१८ पासून १३०४पर्यंतचे आहेत. त्यावरून श्री नरसिंह देवस्थान एक हजार वर्षांपूर्वीचे असावे असे अनुमान निघते. ‘आर्किटेक्चर अॅट विजापूर’ पुस्तकाचे लेखक कॅप्टन मेडो टेलर यांच्या पुस्तकातही या मंदिराबद्दल चालुक्य राजांनी दिलेल्या देणगीच्या शिलालेखाचा उल्लेख केला आहे. त्याचे साल ११९२ आहे. 

नरसिंह मूर्तीएक कथा अशी सांगितली जाते, की विजापूरच्या बादशहाची मुलगी जन्मांध होती. एके दिवशी राजा मुलीच्या चिंतेत बसला असता एका मुसलमान साधूने सांगितले, की अमरपूर (नरसोबावाडी) येथे हिंदू साधू श्री नरसिंह सरस्वतींचे जागृत स्थान आहे. तेथे मुलीला घेऊन जा, सेवा कर, तुझे काम होईल. राजा कन्येला घेऊन वाडीला गेला. सेवा केली. मुलीला दृष्टी आली. राजाने नित्य दर्शनासाठी स्वामींकडे मागणी केली. नंतर किल्ल्याजवळ दोन्ही खंदकांच्या मध्यभागी अश्वत्थाखाली सदैव मूर्त स्वरूपाने आहे, असा राजाला दृष्टान्त झाला. त्याची मनोकामना पूर्ण झाली. राजा तेव्हापासून श्री नरसिंह देवाचे नित्य दर्शन घेत असे. नंतर बादशाहने नरसोबाच्या वाडीला श्रींच्या सेवेसाठी औरवाड व गौरवाड ही दोन गावे इनाम दिली. 

निंबाळ : गुरुदेव रानडे यांची येथे समाधी आहे. निंबाजी संप्रदायाच्या भक्तिसंप्रदायाचे हे ठिकाण आहे. १९व्या शतकात उमडीचे श्री भाऊसाहेब महाराज, ‘जिग्जिवानी’चे श्री अंबुराव महाराज आणि निंबाजी महाराज यांनी या संप्रदायाची स्थापना केली. गुरुदेव रानडे यांचा जन्म तीन जुलै १८८६ रोजी जमखिंडी येथे झाला. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. १९२४ मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून राजीनामा दिला आणि अध्यात्माला वाहून घेतले. ‘फिलॉसॉफी ऑफ उपनिषद’ नावाचे पुस्तक लिहिण्याचे काम त्यांनी पुणे येथे असतानाच सुरू केले होते. त्यांना मानणारा मोठा भक्तसमुदाय येथे आहे. हे ठिकाण विजापूरपासून ४३ किलोमीटरवर आहे.

महात्मा बसवेश्वरबसवण्णा बागेवाडी : हे महात्मा बसवेश्वर यांचे जन्मठिकाण. त्यांनी लिगायत पंथाची स्थापना केली. दक्षिण भारतात प्रामुख्याने कर्नाटकात, महाराष्ट्रात, तसेच तेलंगणमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. त्यांची समाधी या गावाच्या दक्षिणेस ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडाळ संगम येथे आहे. 

कुडाळसंगम : हे लिंगायतांचे तीर्थक्षेत्र आहे. अलमट्टी धरणापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरते वसलेले आहे. कृष्णा आणि मालप्रभा नद्यांचा संगम येथे आहे. लिंगायत संप्रदायाचे संस्थापक बसवण्णा यांची समाधी येथे आहे. 

मुद्देबिहाळ : हे गाव इ. स. १६८०मध्ये हल्लीच्या बसरकोट येथील नाडगौडांच्या पूर्वजांपैकीं परमण्णा याने वसविले. याचा मुलगा हकप्पा याने इ. स. १७२०मध्ये येथील किल्ला बांधला. इ. स. १७६४मध्ये पेशव्यांच्या अंमलाखाली जाऊन सरतेशेवटी इ. स. १८१८मध्ये हे खेडे ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली आले. जवळच्या येलगूर गावात हनुमानाचे मोठे देवस्थान आहे. हे ठिकाण अलमट्टी धरणापासून २७ किलोमीटरवर आहे.

कसे जाल? कोठे राहाल?
विजापूर हे रेल्वे व महामार्गाने पुणे, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद या ठिकाणांशी जोडलेले आहे. जवळचा विमानतळ कोल्हापूरला (१५१ किलोमीटर) आणि बेळगावला (१५७ किलोमीटर) आहे. बेळगावहून मुंबईला रोज विमान असते. कोल्हापुरातून अलीकडेच विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर येथील विमानतळ अजून कार्यान्वित झालेला नाही. विजापुरात राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय आहे. विजापूर शांतपणे बघण्यासाठी दोन दिवस हवेत. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUSBW
Similar Posts
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...
समृद्ध चामराजनगरची सैर तुम्हाला पक्ष्यांची किलबिल, वाघाची डरकाळी ऐकायची आहे? हत्तीचे कळप, सदाहरित वृक्ष, तसेच साग, ऐन, शिसम चंदनाची झाडे... अशी भरपूर वनसंपदा, गवताळ प्रदेश, वनचर यांनी समृद्ध असा प्रदेश पाहायचा आहे? मग चला कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात. ‘करू या देशाटन’मध्ये या वेळी चामराजनगरची सैर.
सफर म्हैसूरची – भाग दोन (वृंदावन) ‘करू या देशाटन’ या सदरात कर्नाटकातील म्हैसूर या निसर्गरम्य जिल्ह्याची सफर आपण करतो आहोत. म्हैसूर सफरीच्या दुसऱ्या भागात आज फेरफटका वृंदावनचा...
कर्नाटकातील ‘सुवर्णभूमी’ : रायचूर भारतात आंध्र प्रदेश-कर्नाटकच्या सीमाभागात खनिज स्वरूपात सोने आढळते. कर्नाटकच्या कोलार, चित्रदुर्ग आणि रायचूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात फेरफटका मारू या रायचूर जिल्ह्यात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language